टीसीएसची नजर आशिया, युरोप अमेरिकेवर

नवी दिल्ली दि.२१- देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा पुरवठादार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्वीसेसने आता व्यवसायवाढीसाठी चीन, जपान, लॅटिन अमेरिका आणि युरोपातील देशांवर आपले लक्ष्य केंद्रीय केले असल्याचे कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की या देशात आमच्या व्यवसायवाढीसाठी खूप मोठी संधी आहे. सध्या जगभरातील ४४ देशांत आम्ही कार्यरत आहोतच. युरोपमधील व्यवसायात वाढ होण्याची अपेक्षा आहे कारण युरोपात सध्या ग्राहकांशी आमची अनेक डील्स झालेली आहेत. २०११-१२ मध्ये कंपनीने मिळविलेल्या एकूण महसूलात उत्तर अमेरिकेतील महसूलाचा वाटा सर्वाधिक म्हणजे ५३.३०टक्के इतका आहे. तर यूके व युरोपमधील वाटा २५.३२ इतका आहे.

कंपनी पुरवित असलेल्या बँकींग, वित्तसेवा आणि विमा सेवेतून झालेल्या व्यवसायाचा वाटा ४३.०८ टक्कयांवर गेला असून रिटेल, ग्राहक उत्पादने आणि औषधनिर्माणमध्येही कंपनीची प्रगती उल्लेखनिय होत आहे असे सांगून चंद्रशेखरन म्हणाले की क्लाऊड, अॅनॅलेटिक्स, बिग डेटा व मोबिलीटी या सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने अनेक आव्हानांना सामोरे जाणे आम्हाला शक्य झाले आहे.