अमेरिकेची ऑलिविया कुल्पो मिस युनिवर्स

लास वेगास: मिस युएसए ऑलिविया कुल्पो या सुंदरीने मिस युनिवर्स- २०१२ हा किताब पटकावला. गतसालची मिस युनिवर्स लीला लोपेझ हिने अ‍ॅलिवियाच्या डोक्यावर किताबाचा मुकुट चढविला.

फिलीपाईन्सची जेनी टगोनन या स्पर्धेत उपविजेती ठरली. व्हेनेझुएलाची इरेन ईसर हिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. लास वेगास या मायानगरीत आयोजित केलेल्या भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत जगभरातील ८९ ललनांनी भाग घेतला. सुप्रसिद्ध अमेरिकन गायक लो ग्रीन, व्हेनेझुएलाचा विख्यात बेसबॉल खेळाडू पाबलो सेंडोवाल, जपानचा प्रसिद्ध शेफ माशाहारू मारीमोती आणि अमेरिकेची बीच व्हॉलीबॉलपटू केरी वोल्स जेनिंग्स या मान्यवरांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

या स्पर्धेत भारताची शिल्पा सिंह ही सुंदरीही सहभागी झाली. तिला अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले.