काँग्रेसमध्ये लवकरंच मोठे फेरबदलः सोनिया गांधी

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षात लवकरंच महत्वपूर्ण फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले. मात्र राहुल गांधी यांना दिल्या जाणाऱ्या जबाबदारीबद्दल विचारले असता; त्याबाबतही लवकरच निर्णय होईल; असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सोनिया यांनी हिमाचलच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र गुजरात विधानसभेचे निकाल सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही अडचणीचे ठरणार असल्याने त्याबाबतचे असमाधान गांधी यांनी गुजरातचा उल्लेख टाळून दाखवून दिले.

हिमाचलच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला विजयी करण्यात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचा महत्वाचा वाटा असला तरीही मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक दि. १८ आणि १९ जानेवारी रोजी जयपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वीच पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जातील; असे सोनिया गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यावर दिल्या जाणाऱ्या जबाबदारीची माहितीही प्रसारमाध्यमांना लवकरच मिळेल; एवढेच त्या म्हणाल्या.

Leave a Comment