भारतीय ऑलिम्पिक संघ निलंबित

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघाला निलंबित केले आहे. संघाच्या निवडणुकीत सरकारने हस्तक्षेप केल्याने ऑलिम्पिक नियमांचे उल्लंघन झाल्याचा महासंघाचा आक्षेप आहे.

या निलंबनामुळे भारतीय खेळाडू ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. महासंघाकडून क्रीडा विकास आणि स्पर्धांसाठी मिळणारा कोणताही निधी अथवा अनुदान भारताला मिळू शकणार नाही. भारतीय ऑलिम्पिक संघाचे प्रतिनिधी महासंघाच्या कोणत्याही कार्यक्रमाला अगर स्पर्धांना उपस्थित राहू शकणार नाहीत.

संघाच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप नसावा आणि संघाच्या निवडणुका स्वतंत्रपणे पार पडाव्या याबाबत अनेक महिन्यांपासून वेळोवेळी सूचना देऊनही संघ महासंघाच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने निलंबनाची कारवाई करण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नव्हता; असा दावा महासंघाच्या सूत्रांनी केला आहे. मात्र महासंघाकडून निलंबनाच्या कारवाईबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचा दावा संघाचे प्रभारी अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांनी केला.