शिवाजी पार्कवरील जागा खाली करा: महापालिकेचे नोटीस

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या शिवाजी पार्क येथील जागेवरील चौथरा काढून जागा रिकामी करण्यात यावी; अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिका प्रशासनाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांना बजावली आहे.

बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराला होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यासाठी केवळ २ दिवस मुदतीसाठी ही जागा महापालिकेने दिली होती. मात्र अद्याप या जागेवरील चौथरा आणि मंडप काढून टाकण्यात आलेला नसल्याने ही नोटीस बजावण्यात आली.

मात्र याबाबत आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही त्यामुळे तो चौथरा काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही; असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांचे अंत्यसंस्कार झालेली जागा हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. अद्याप त्या ठिकाणी शिवसैनिक अजूनही येत आहेत. त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी चौथरा हटविला जाणार नाही; असेही राऊत म्हणाले. नोटीस मिळाल्यास तिला उत्तर दिले जाईल; असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment