…तर दक्षिण चीन सागरात नौदल तैनात करू: नौदलप्रमुख

नवी दिल्ली: तेला क्षेत्राच्या संरक्षणासाठी आवश्यकता पडल्यास भारतीय नौदल दक्षिण चीनच्या समुद्रात तैनात करण्यात येईल; अशी ग्वाही नौदलाचे प्रमुख एडमिरल डी. के. जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नौदल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय नौदल चीनच्या समुद्रात तैनात करण्याची वेळ आल्यास नौदलाचा पूर्व विभाग महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो; असे स्पष्ट करून एडमिरल जोशी म्हणाले की; भारतीय नौदलाकडे असलेल्या अण्वस्त्रधारी पाणबुडी आयएनएस चक्र आणि विमानवाहू युद्धनौका आयएनएस जलाश्व याचा उपयोग दक्षिण चीनी समुद्रात करण्यात येईल.

व्हिएतनामच्या सागर किनाऱ्यावर ओएनजीसीची ४ तेलक्षेत्र असून जर त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यकता पडली तर भारतीय नौदल हस्तक्षेप करेल; असे एडमिरल जोशी यांनी सांगितले.

दक्षिण चिनी समुद्रात चीनने आक्रमक धोरण अंगिकारले असून या समुद्रातून प्रवास करणाऱ्या जहाजांची झडती घेण्याचा अन्याय्य कायदा चीनने संमत केला आहे. चीनच्या या आडदांडपणाचा फ़िलिपाईन्स, तैवान, व्हिएतनाम आणि भारत या देशांनी निषेध केला आहे.