ज्येष्ठांना मारहाण खपवून घेणार नाही: राज ठाकरे

मुंबई: ज्येष्ठ नागरिक असलेल्या कंत्राटदाराला मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकावर कारवाई करण्यात येईल; अशी ग्वाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करण्यासारख्या कृत्यांना पक्ष पाठीशी घालणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

कल्याण (पूर्व) येथील गणेशवाडी भागातील पाण्याच्या पाईप लाईन्स नादुरुस्त असल्याने या भागातील पाणी पुरवठा तब्बल ४ दिवस खंडीत होता. या पाईप लाईन्सची दुरुस्ती करण्यास महापालिकेचे ६५ वर्ष वयाचे कंत्राटदार डी. जी. पाटील जाणून बुजून विलंब करीत असल्याच्या समजुतीने या भागातील मनसेचे नगरसेवक नितीन निकम यांनी पाटील यांना मारहाण केली.

या मारहाणीचे चित्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखविण्यात आले. या घटनेने ठाकरे अत्यंत व्यथित झाले असून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत; असा इशारा देण्यात आल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस अखिलेश चौबे यांनी दिली.

Leave a Comment