राणा आणि हेडली यांना भारताच्या ताब्यात द्या: खुर्शीद

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचे आरोपी तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली यांना भारताच्या ताब्यात द्यावे; अशी मागणी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी अमेरिकेकडे केली आहे. भारताच्या या मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल; असेही अमेरिकेने भारताला कळविले आहे.

राणा आणि हेडली हे दोघेही आरोपी अमेरिकेच्या ताब्यात असून राणाला फाशी दिली जाणार आहे; तर हेडली याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेची घोषणा दि. १७ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. अमेरिकेतील शिकागो न्यायालय या शिक्षा सुनावणार आहे.

अमेरिकेचा नागरिक असलेला हेडली हा लष्कर ए तोयबाचा अतिरेकी असून त्याने तपासकामात अमेरिकन पोलिसांना सहकार्य केल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही; हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्याच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते. मुंबई हल्ल्यातील पाहणी, नियोजन आणि सहभागी दहशतवाद्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल अमेरिकन न्यायालयाने हेडली याला दोषी ठरविले आहे.