पंतप्रधानपदाची शर्यत

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान पदांच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा रंग घेऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली आहे; तर लंडनच्या ‘दि इकोनॉमिक्स टाईम्स’ या वृत्तपत्राने काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे नाव या पदासाठी पुढे केले जाईल; अशी शक्यता वर्तविली आहे.

चिदंबरम यांनी काँग्रेसला संकटातून बाहेर काढण्याचे काम दोन वेळा समर्थपणे केले आहे. त्याचप्रमाणे देशभरातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी चिदंबरम यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे चिदंबरम यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले जाईल; अशी या वृत्तपत्राची अटकळ आहे. काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी कोणतेही महत्वाचे पद घेण्यास तयार नसल्याने हे पद चिदंबरम यांना बहाल केले जाईल; असा अंदाज ‘दि इकोनॉमिक्स टाईम्स’ने वर्तविला आहे.

दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर आपला दावा करण्यासाठी गुजरातच्या गादीवर आपला वारसही नेमून ठेवल्याचे वृत्त आहे. गुजरातचे राज्यमंत्री सौरभ पटेल यांना मोदी यांनी आपला उत्तराधिकारी नेमल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

Leave a Comment