गुजराथ प्रचारात राहुलचा सहभाग अत्यल्प

नवी दिल्ली दि.३०- गुजराथेतील पहिल्या टप्प्यासाठी विधानसभा मतदानाची तारीख १५ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही काँग्रेस निवडणूक समितीचे प्रमुख म्हणून नुकतेच पद घेतलेल्या राहुल गांधींचा प्रचार दौर्याूचा कार्यक्रमच अजून तयार नसल्याचे समजते. गुजराथेत राहुल गांधी यांना प्रचारात उतरविले जाणार नसल्याचे पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजराथेत आकटोबरमध्येच राजकोट येथून प्रचाराचा आरंभ केला आहे. मात्र गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्यासमोर राहुल गांधी यांना प्रचारात उतरवू नये असे ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राहुल यांच्यासाठी अगदी मोजक्या १-२ सभाच ठेवल्या जातील असे सांगण्यात येत आहे. २०१४ सालात येणार्या  लोकसभांवर लक्ष ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्यथा मोदींसाठी या निवडणुका सेमी फायनल मॅचच ठरतील आणि मोदींना हेच हवे आहे याविषयी काँग्रेस वरीष्ठांना संशय नाही.

मोदी या निवडणुक प्रचारांतून स्वतःला राष्ट्रीय नेता आणि पंतप्रधानपदाचा भावी उमेदवार म्हणून जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर या ना त्या कारणाने सतत टीका करून आणि वाद घालून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी राहुल यांना त्यांच्यासमोर उभे करणे इष्ट नाही असा तज्ञांचाही सल्ला आहे.