अण्णा टीमचा अज्ञात देणगीदार

पुणे दि. ३०- सार्वजनिक क्षेत्रात कोणताही व्यवहार पारदर्शकतेनेच केला जावा असा आग्रह असणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या टीमसाठी दरमहिन्याला १ लाख रूपयांची देणगी देणार्या  देणगीदाराचे नांव मात्र उघड करण्यास टीम अण्णानी असमर्थता दर्शविली असल्याचे समजते. हा अज्ञात देणगीदार पुढील वर्षापासून टीम अण्णाला दरमहिना १ लाख  रूपये देणगी म्हणून देणार आहे.

विशेष म्हणजे नव्या टीम अण्णांत समाविष्ट असलेल्या सदस्यांनाही या देणगीदाराचे नांव सांगण्यात आलेले नाही.मात्र ही देणगी येणार आहे याची कल्पना दिली गेली आहे. तसेच ही व्यक्ती अनिवासी भारतीय असून चार्टर्ड अकौंटंट आहे असेही सांगितले गेले आहे. गांधीवादी विचाराची ही व्यक्ती देशात चालविल्या जात असलेल्या अनेक सामाजिक कार्यक्रमांत सक्रीय सहभागी होते अशीही माहिती मिळत आहे.

नवीन टीम अण्णांसाठी दिल्लीच्या सर्वोदय एन्क्लेव्हमध्ये कार्यालयीन जागा घेण्यात आली आहे. त्याचे भाडे महिना ५० हजार रूपये आहे शिवाय पाणी, वीज बिल असे अन्य खर्च आहेत. ते या देणगीतून भागविले जाणार आहेत असे टीम अण्णा सदस्या कीरण बेदी यांनी सांगितले आहे. पुढील वर्षापासून देण्यात येणार्याण या देणगीपोटी आत्ताच सहा महिन्यांचे पोस्ट डेटेड चेक टीमकडे जमा करण्यात आले आहेत असेही समजते. या व्यक्तीनेच आपले नांव जाहीर करू नये अशी विनंती केल्याने नांव जाहीर केले जात नसल्याचे सांगून बेदी म्हणाल्या की अण्णांना या व्यक्ती ची माहिती देण्यात आली आहे आणि चांगल्या कार्यासाठी मदत म्हणून ही देणगी दिली जात आहे.

विशेष म्हणजे करोडो रूपयांच्या देणग्या गोळा करणार्या  राजकीय पक्षांवर अण्णांचा नेहमीच आक्षेप असतो. देणग्या गेाळा करताना राजकीय पक्ष त्यांच्या सोयीचे कायदे करतात असे अण्णांचे म्हणणे आहे. वीस हजार रूपयांपर्यंत देणगी असेल तर त्याचा हिशोब द्यावा लागत नाही. याचा फायदा घेऊन राजकीय पक्ष उद्योगपतींकडून करोडो रूपयांच्या देणग्या घेतात आणि बनावट नावाने वीस वीस हजारांच्या पावत्या बनविल्या जातात व त्यातूनच काळा पैसा निर्माण होतो असा अण्णांचा दावा आहे.

Leave a Comment