इस्लामाबाद: रक्तपिपासू दहशतवादी अजमल कसाब याला फासावर चढविण्यात आल्यानंतर पाकिस्तानातील उर्दू माध्यमांनी आपल्या अकलेचे तारे तोडण्यास सुरुवात केली आहे. कराचीहून प्रसिद्ध होणार्या डेली उम्मत या वृत्तपत्राने तर कसाबला फाशी देण्यापूर्वीच त्याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
एकीकडे कसाबला खरोखर फाशी देण्यात आली की त्यापूर्वी एक दिवस आधीच त्याचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे; असा सवाल या वृत्तपत्राने भारत सरकारला केला आहे. मात्र त्याच लेखात कसाब डेंग्यूने मरण पावल्याची माहिती योग्यच असल्याचे गृहीत धरून ‘ भारत सरकारला एवढी कसली घाई झाली होती; कसाब बारा होईपर्यंत वाट पाहण्यास काय हरकत होती; असाही सवाल करण्यात आला आहे. रोजनामा एक्स्प्रेस या वृत्तपत्राने कसाबच्या दफनविधीबाबत कंड्या पिकवायला सुरुवात केली आहे. येरवडा कारागृहात कसाबचा मृतदेह दफन करणे धोक्याचे असल्याने त्याचे लादेनच्या मृतदेहाप्रमाणे खोल समुद्रात दफन करण्यात आल्याचे वृत्त रोजनामा एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.
लाहोर येथील रोजनामा दुनिया या वृत्तपत्रातील एका सदराच्या लेखकाने कसाबला बॉलीवूड स्टारच बनविले आहे. कसाबची फाशी हा ‘अ वेन्सडे’ या चित्रपटाचा ‘पार्ट टू’ असल्याचे नमूद करून लेखक त्याच्या सदरात म्हणतो की; कसाब जेव्हा मुंबईत रक्ताची होळी खेळत होता तेव्हा त्याचे केस चमकत होते. त्याच्या अंगावर कडक इस्त्रीचा वेश होता. त्याच्या चेहेरा गुळगुळीत दाढी केलेला आणि रुबाबदार होता. तो मुंबईच्या रस्त्यावरून असा निर्धास्त धावत होता की त्याला कुणाची गोळी लागणे शक्यच नाही. एखादा बॉलीवूडचा हिरोच जणू!