लंडन दि.२१ – इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीतील भावी राजा आणि राणी असलेले प्रिन्स विल्यम्स आणि प्रिेन्सेस केट मिडलटन यांच्या घरात पाळणा हलणार असल्याचे गुपित केटची जिवाभावाची मैत्रीण जेसिका हे हिने एका ऑस्ट्रेलियन मासिकाकडे उघड केले आहे. अर्थात केट आणि विल्यम्स ही बातमी अधिकृतरित्या डिसेंबरमध्ये जाहीर करणार आहेत असेही तिचे म्हणणे आहे.
तीस वर्षीय केट आणि विल्यम्स यांचा एप्रिल २०११ मध्ये शाही विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर केटच्या प्रेग्नन्सीची बातमी कधी येते यावर अनेक प्रसारमाध्यमे लक्ष ठेवून होती. जिने ही बातमी दिली आहे ती जेसिका केटची रूममेट होती आणि केटच्या विवाहसोहळ्यास ती उपस्थितही होती. तिच्या म्हणण्यानुसार आपल्या कुटुंबाचा लवकरात लवकर विस्तार करण्याचा या दोघांचाही मानस होता मात्र गतवर्षात राणीचा हिरक सोहळा तसेच लंडन ऑलिंपिक्स व अन्य कार्यक्रमांमुळे हा निर्णय थोडा लांबणीवर टाकला गेला होता.
केट आणि विल्यम्स यांनी त्यांच्या कुटुंबाबाबतचा निर्णय एकमेकांशी चर्चा करून घेतला असून त्यांना दोन मुले अथवा दोन मुली इतकीच अपत्ये हवीत असेही जेसिकाचे म्हणणे आहे.