बाळासाहेबांनंतर……

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुःखद निधनानंतर आता अभावितपणेच त्यांच्या नंतर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही कर्तबगार नेत्यानंतर अशी चर्चा होत आली आहे. पंडित नेहरू गेल्यानंतर अशीच चर्चा केवळ सुरू झाली होती असे नाही तर नेहरुंच्या हयातीत त्यावर पुस्तके लिहिली गेली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याही बाबतीत तसाच प्रकार घडला आहे. ते थकले आणि पूर्वीसारखे झंझावाती दौरे करेनासे झाले तेव्हाच आता शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्या नंतर कोणाच्या हातात राहणार अशी चर्चा सुरू झाली होतीच. 

बाळासाहेब हे मोठे वादळी व्यक्तिमत्त्व. बोलणेही असे की  त्यांच्या राजकीय विरोधकांनीही त्यांना ‘फायरब्रँड’ वक्ता असे बिरूद आपणहून बहाल केले होते. केवळ शिवसैनिकांनीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ही गोष्ट फार पूर्वीपासून म्हणजे २० वर्षांपासून ताडली होती की, राज ठाकरे ही बाळासाहेबांची कॉपी असल्याने बाळासाहेब त्यांच्याकडेच आपला वारसा सोपवणार. उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र असले तरीही शिवसेनेच्या भल्यासाठी  बाळासाहेब आपला कौल पुतण्याला देणार. जेव्हा पासून  या दोघांचा शिवसेनेच्या क्षितिजावर उदय झाला होता तेव्हापासून लोकांनी आपल्या मनाशी या दोघांची तुलना केली होती.

पण प्रत्यक्षात बाळासाहेबांनी उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद देऊन लोकांच्या या संबंधातल्या अपेक्षांना धक्का दिला. शिवसेनेच्या आत आणि बाहेर जी कल्पना केली जात होती तिला हा धक्का होताच पण राज ठाकरे यांनाही तो धक्का होता. त्याची प्रतिक्रिया काय उमटली हे सर्वांना माहीत आहे. मनसेची स्थापना झाली. शिवसेनेतून नारायण राणे आणि भुजबळ बाहेर गेले. भुजबळांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले तर राणे यांनी काँग्रेसची वाट धरली पण राज ठाकरे यांच्या बाहेर जाण्याने पक्षात फूट पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली. तेव्हापासूनच्या घटना आपल्याला माहीत आहेत कारण त्या ताज्या आहेत.

शिवसेनेतल्या फुटीनंतर काय झाले याची फार चर्चा न करता एवढेच म्हणता येईल की या फुटीने राज ठाकरे यांचा अहंकार सुखावला. त्यांना शिवसेनेत राहून फार किंमत मिळाली नसती ती मिळाली. पण आता आता हे लक्षात यायला लागले आहे की, ते फार मोठी मजल मारू शकणार नाहीत. ज्यांना शिवसेनेचे आणि पर्यायाने राज ठाकरे यांचेही खच्चीकरण करायचे असते असे लोक शिवसेनेतली ही फूट कायम रहावी असा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून ते राज ठाकरे  यांना हरभर्यािच्या झाडावर चढवत असतात. त्यामुळे त्यांनाही शिवसेना संपणार आणि आपली मनसेना मोठी होणार असे वाटत असते. पण वस्तुस्थिती लपत नाही. तिकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाताळली आहेत. आहेत म्हणजे ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून अगदीच काही अपयशी ठरलेत असे नाही. बाळासाहेब हयात होते तोपर्यंत तरी चांगल्या प्रकारे निभावले. फार मोठी मजल मारली नाही पण फार काही फजिती झाली असेही घडले नाही.

आता बाळासाहेबांच्या माघारी शिवसेनाप्रमुख हे पद उद्धव यांना द्यावे असा प्रस्ताव समोर येणार यात काही शंका नाही. पण बाळासाहेबांचे शिवसेनेवर आणि शिवसैनिकांवर जसे नियंत्रण होते तसे उद्धव यांचे राहणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आह. बाळासाहेब हयात होते तोपर्यंत दुसरी फळीही बाळासाहेबांच्या चरणी लीन होती पण तिच्यातही काही हेवेदावे नाहीत असे नाही. तेही उफाळून येणारच नाहीत असे काही नाही. उद्धव ठाकरे यांचा सल्लागार कोण यासाठी चढाओढ लागू शकते. अशा वेळी राज आणि उद्धव यांनी आपल्या दोघांच्याही मर्यादा ओळखून एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे. राज आपल्यापासून दुरावले आहेत याची बाळासाहेबांना आपल्या जीवनाच्या शेवटच्या पर्वात फार चिंता लागून राहिली होती. त्यांनी आधी आडून आडून आणि आता आता तर उघडपणे  राज ठाकरे यांचे शिवसेनेत स्वागतच करू असे म्हटले होते. या दोघांनी एकत्र येऊन शिवसेना मोठी करावी अशी बाळासाहेबांची इच्छा होती.

या दोघांनीही आपले अहंकार दूर ठेवून निदान बाळासाहेबांची इच्छा होती म्हणून का होईना पण शिवसेनेवर लागलेला हा फुटीचा डाग पुसून टाकला पाहिजे. नाही तरी शिवसेनेतली ही फूट काही फार मोठ्या वैचारिक मतभेदातून झालेली नाही. अगदी भुजबळ आणि राणे बाहेर पडले तेही काही वैचारिक वादातून बाहेर पडलेले नाहीत. अर्थात आता भुजबळ आणि राणे काही परत येणे शक्य नाही पण राज ठाकरे यांना परत आणणे शक्य आहे. शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्याही मनाचा कानोसा घेतला तर तेही या दोघांनी एक झाले पाहिजे असेच मत मांडतील. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मक्तेदारीला आव्हान देण्याची ताकद शिवसेनेतच आहे. शिवसेना अखंड झाली नाही तर राज्यात चांगला विरोधी पक्ष उरणार नाही. आणि सत्ताधार्यां वर कोणाचाच अंकुश राहणार नाही.  लोकशाहीची ही आवश्यक गरज म्हणून तर शिवसेना बळकट झाली पाहिजे.

Leave a Comment