बूमबूम १२-१२-१२

1212

पुणे/मुंबई दि.२१ – या दशकातील शेवटची युनिक तारीख म्हणजे १२-१२-१२ कायमची स्मृतीत ठेवण्यासाठी अपत्यप्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांची एकच गडबड उडाली असून ज्या महिलांचे दिवस या काळात भरत आहेत, त्या आणि त्यांचे पती आपापल्या  डॉक्टरांना आपल्या अपत्याच्या जन्मासाठी हा मूहूर्त गाठण्याची गळ घालत आहेत असे शहरांतील स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ञांकडून समजते. ज्यांची प्रसूती सिझेरियन पद्धतीने करावी लागणार आहे, ते पालक अशी गळ घालण्यात आघाडीवर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.            

आजकाल सिझरियन पद्धतीने शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्याचा ट्रेंड वाढत चालला असतानाच चांगला मूहूर्त पाहून प्रसूती करण्याकडेही अगदी सुशिक्षित पालकांचा कल असतो असे सांगून वरीष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ.पै म्हणाल्या की गेली कांही वर्षे हा ट्रेंड सातत्याने दिसून येत आहे. गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर ११ या दिवशीही प्रसूती करावी यासाठी अनेकांनी आम्हाला विनंती केली होतीच. अनेक जण पंडितांकडून मुहूर्त काढून आणतात आणि त्या वेळीच प्रसूती करावी असा आग्रह धरतात. पण प्रत्यक्षात पेशंटची परिस्थिती पाहिल्याशिवाय कोणताच डॉक्टर अशी विनंती मान्य करू शकत नाही हे लक्षात घेतले जात नाही.
 
यंदाच्या दशकातली १२ डिसेंबर १२ ही तारीखही त्याला अपवाद नाही. आत्तापासूनच अनेक पेशंट याच तारखेला आपले बाळ जन्माला यावे अशी अपेक्षा करत आहेत आणि त्यासाठी डॉक्टरांना या दिवशीच प्रसूती करावी अशी विनंती करत आहेत. आत्तापासूनच हा ओघ सुरू झाला असून आगामी कांही दिवसांत तो अधिकच वाढेल यात शंका नाही. अर्थात खरोखरच पालकांची ही इच्छा पूर्ण होऊ शकत असेल तर आमचीही आडकाठी नसते मात्र पेशंटचा जिवाशी खेळ करून असले प्रकार करण्यास मात्र आमचा सक्त विरोध आहे असेही त्या म्हणाल्या.

मुंबईच्या पवई येथील हिरानंदानी रूग्णालयाकडेही अशा प्रकारची चौकशी करणार्या् पालकांची संख्या वाढत असल्याचे तेथील प्रसूतीतज्ञ डॉ. अनिता सोनी यांनी सांगितले.

Leave a Comment