वॉशिंग्टन दि. २१- घुबड हा पक्षी भारतात अशुभ मानला जात असला आणि त्याचे दर्शन झाले तर कांही तरी विपरित घडणार अशी लोकांची धारणा असली तरी युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमधील संशोधकांना मात्र या घुबडांनी विशेष भुरळ घातली आहे. अर्थात इंग्लंडमध्ये घुबड अशुभ मानले जात नाही. मात्र संशोधकांना त्याच्या पंखांविषयी अधिक आकर्षण आहे आणि त्यावरच त्यांचे संशोधन सुरू आहे.
घुबडाच्या पंखांप्रमाणे विमान पंख बनविण्याचा संशोधकांचा प्रयत्न
आकाशात हवेच्या प्रवाहाविरोधात उडणारे पक्षी अथवा कोणतीही यांत्रिक वस्तू प्रचंड आवाज करते कारण हवेला केल्या जात असलेल्या विरोधामुळे हा आवाज होत असतो. प्रवासी अथवा लढावू विमाने हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. मात्र घुबडे कितीही उंच आणि वेगाने उडली तरी त्यांच्या पंखांचा मात्र अगदी सूक्ष्म आवाज होतो व यामुळेच ती आपले भक्ष्य अगदी अलगद पकडू शकतात ही बाब संशोधकांच्या लक्षात आली आणि विमानाचे पंखही घुबडांच्या पंखांसारखेच बनविले तर त्यांचा आवाज कमी करता येईल का याचे संशोधन सुरू झाले असे या विद्यापीठातील संशोधक जस्टीन जार्वोरस्की यांनी सांगितले.
घुबडांच्या पंखांचे बारकाईने निरीक्षण करताना असे आढळले की त्यांच्या पंखांच्या पुढच्या बाजूस मऊ पदार्थांचे आवरण असते तर मागची बाजू लवचिक असते. विमानांसाठी जाळीदार आणि इलॅस्टीकचा वापर करून असे पंख बनविले गेले तर विमानांचाही उडताना आवाज एकदम मियंत्रणात येईल असा विश्वास या संशोधकांना वाटत असून भविष्यात विमानांच्या आवाजापासून आपली सुटका होईल अशी आशा करायला हरकत नाही.
