चाळीस वर्षांनंतर स्यू की भारतात दाखल

नवी दिल्ली,१३ नोव्हेंबर-म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की तब्बल ४० आज (मंगळवार) भारतात दाखल झाल्या आहेत. सात दिवसांच्या भारत दौर्‍यामध्ये त्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचीही भेट घेतील. याच वर्षी मेमध्ये मनमोहनसिंग यांनी म्यानमारला भेट दिली होती. त्या भेटीत त्यांनी स्यू की यांना ’जवाहरलाल नेहरू मेमोरिअल लेक्चर’ देण्यासाठी निमंत्रित केले होते. हे व्याख्यान उद्या (बुधवार) होईल.

परराष्ट* सचिव रंजन मथाई यांनी स्यू की यांचे विमानतळावर स्वागत केले. ’’म्यानमारशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत स्यू की यांचा भारत दौरा महत्त्वाचा आहे,’’ असे परराष्ट* मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. स्यू की यांचे शिक्षण झालेल्या श्रीराम महाविद्यालयालाही त्या भेट देणार आहेत. त्याशिवाय, बंगळूरमधील ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ आणि ’इन्फोसिस’लाही त्या भेट देतील. भारतामधील महिला सबलीकरणाच्या योजना आणि ग्रामीण विकास पाहण्यासाठी स्यू की आंध्र प्रदेशमधील काही ग्रामीण भागांतही दौरा करतील.

स्यू की यांची आई म्यानमारच्या राजदूत म्हणून भारतात असताना त्यांनी १९६० मध्ये दिल्लीत शिक्षण घेतले होते. त्यानंतरची स्यू की यांची ही पहिलीच भारतभेट आहे.

म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी लढा उभारणार्‍या स्यू की यांना अनेक वर्षे तुरुंगवासात काढावी लागली. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर लगेचच स्यू की यांची सुटका झाली होती. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर स्यू की यांच्या ’नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ या पक्षाला संसदेत स्थान मिळाले. स्यू की या सध्या संसदेतील विरोधी पक्षनेत्या आहेत.