वॉशिग्टन दि.१० – अमेरिकेच्या सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच सीआयए संस्थेचे संचालक डेव्हीड पेट्रोस यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी सायंकाळी राष्ट्राध्यक्ष बराका ओबामा यांच्याकडे राजीनामा दिला असून राष्ट्राध्यक्षांनी तो स्वीकारला आहे. पेट्रोस यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधांची कबुली देतानाच आपली ही वागणूक क्षम्य नाही असे कारण देऊन हा राजीनामा दिला आहे.
पेट्रोस यांच्या विवाहाला ३७ वर्षे झाली आहेत आणि ते एका लफड्यात गुंतले. मात्र त्याची खुली कबुली देताना त्यांनी एक नवरा म्हणून आणि सीआयए सारख्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या संस्थेचा प्रमुख म्हणून आपली ही वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. पेट्रोस यांची गेल्या वर्षीच सीआयएचे संचालक म्हणून नेमणूक झाली होती. त्या अगोदर अनेक वर्षे त्यांनी लष्करात वरीष्ठ पदावर काम केले असून इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेला योग्य पथावर ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारीही पार पाडली आहे.
ओबामा यांनी पेट्रोस यांचा राजीनामा स्वीकारतानाच त्यांनी केलेल्या देशाच्या सेवेबद्दल त्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले पेट्रोस यांनी देशापुढची लष्करी बाबीतील नवी आव्हाने धैर्याने स्वीकारली, लष्कराच्या समस्या सोडविल्या आणि इराक अफगाणिस्तानच्या युद्धाला योग्य दिशा दिली. त्यांच्यामुळे देश सुरक्षित आणि बळकट बनण्यास खूपच मदत झाली. सीआयए साठीही त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.