मनमोहनसिंगाचे ओबामांना भारत भेटीचे आमंत्रण

नवी दिल्ली दि.११ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आलेल्या बराक ओबामा यांचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी फोनवरून अभिनंदन केले असून त्यांना पुन्हा भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. मनमोहनसिंग यांनी ओबामांना दोन्ही देशांनी घेतलेल्या पुढाकामुळे विकासाची अधिक संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. ओबामा यांनी दोन्ही देशांच्या संबंधात वैयक्तीक लक्ष घातले आणि दिलेला शब्द पाळला. हेच सहकार्य यापुढील काळातही कायम राहिल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

बराक ओबामा यांनीही पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे आभार मानले आणि भारत अमेरिकेसाठी वंडरफुल पार्टनर ठरला असल्याचे नमूद केले. ते म्हणाले भारत अमेरिका संबंध गेल्या कांही काळापासून उत्तम आहेत आणि येत्या कांही वर्षात ते अधिक दृढ होतील. जागतिक मंचावर मनमोहनसिंग हे उत्तम नेतृत्व असल्याचेही ओबामा यांनी सिंग यांना सांगितले. यापुढेही दोन्ही देश विविध क्षेत्रात एकत्र येऊन काम करतील असे सांगतानाच त्यांनी भारत भेटीचा आपण नक्की विचार करू असेही आश्वासन डॉ. सिंग यांना दिले.