वॉशिंग्टन: अमेरिकेत थैमान घालणार्या सँडी या चक्रीवादळापाठोपाठ आणखी एका वादळाने अमेरिकेला पुन्हा पछाडले आहे. या वादळाची क्षमता सॅंडीपेक्षा कमी असली तरीही या वादळाने सुमारे ५ लाख घरे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. आगामी २४ तासात अतिवृष्टीसह ६० मैल प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता अमेरिकन हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून आलेल्या सँडी या चक्रीवादळाने न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या ठिकाणी हाहा:कार माजविला. या संकटाने १२१ जणांचा आली घेतला. सँडीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच अमेरिकेला आणखी एका वादळाने तडाखा दिला. या वादळामुळे अमेरिकेत ठिकठीकाणी अतिवृष्टी, हिमवृष्टी आणि वादळी वार्यांनी हजेरी लावली आहे. यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याबरोबर रेल वाहतूक आणि विमान वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरही अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसर्यांदा निवडून आलेल्या बराक ओबामा यांच्या प्रशासनासमोर या वादळाने आव्हान उभे केले आहे. या दरम्यान ग्वाटेमाला येथे झालेल्या भूकंपाने ४८ जणांचा बळी घेतला आहे.