महागाईला झुगारून ग्राहकांची सोने खरेदी

पुणे दि. ८ – महागाईची झळ सर्वच क्षेत्रांना बसली आहे आणि देशातील नागरिक महागाईच्या झळात पोळून निघत आहेत असे चित्र असले तरी सणांचे दिवस लक्षात घेऊन ग्राहकांनी ही महागाई विस्मरणात टाकली असल्याचे चित्र सराफ बाजारात दिसत आहे. दिवाळी ऐन तोंडावर आली असताना सराफांच्या दुकानात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे आणि ही दुकाने गर्दीने भरून अक्षरशः वाहात असल्याचे दृष्य पाहावयला मिळते आहे. सोन्याचा भाव ३१ हजारांची पातळी ओलांडून गेला असला तरी दिवाळीसाठी दागिने खरेदी करण्याची लगबग ग्राहकांत दिसून येत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध सराफी पेढी पु.ना.गाडगीळचे मालक सौरभ गाडगीळ म्हणाले की गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक विक्री होत असल्याचे संकेत मिळत आहेत.दसर्या पासूनच ग्राहकांची गर्दी वाढती असून धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला ही खरेदी हिपवर पोहोचेल असा अंदाज आहे. आता ग्राहकांची मागणी घडविलेल्या दागिन्यांसाठी आहे. गुंतवणूक म्हणून सोन्याची वेढणी किवा नाणी ग्राहक खरेदी करतात पण दिवाळी दसर्या ला वेढणी किंवा नाण्यांपेक्षा दागिन्यांना प्राधान्य दिले जाते असा अनुभव आहे. दिवाळीपाठोपाठ लग्नसराईचा सिझन असल्याने ग्राहकांची सोन्याची मागणी आणखी कांही महिने अशीच राहणार आहे असेही ते म्हणाले. दसर्याचलाच विक्रीत ५० टक्के वाढ दिसली होती दिवाळीत ती याहीपेक्षा अधिक असेल असे आत्तातरी दिसत आहे.

गोल्ड मार्ट ज्युवेलरच्या संचालक संगीता ललवाणी म्हणाल्या की दागिन्यांना सणांच्यावेळी अधिक मागणी असते कारण नाणी किवा सोन्याच्या लगडी हा सेलिब्रेशनचा भाग होऊ शकत नाहीत. सणावारी खरेदी केलेले दागिने लोक लगेच वापरू शकतात. धनत्रयोदशीदिवशी दागिन्यांची मागणी वाढते आणि यंदा मंगळसूत्रांना खूपच मागणी असल्याचे लक्षात येत आहे.

गाडगीळ अधिक माहिती देताना म्हणाले की सोन्याप्रमाणेच प्लॅटिनम धातूही महाग आहे मात्र प्लॅटिनमच्या दागिन्यांना भारतीयांची मागणी कमी आहे. सोन्याची क्रेझ प्लॅटिनमला नाही आणि दिवाळीसारख्या सणांना तर सोन्याला प्लॅटिनम हा पर्याय कधीच होऊ शकणार नाही. जगात वर्षाला ४००० टन सोने खपते तर प्लॅटिनमचा खप ४० टन इतकाच असतो असेही त्यांनी सांगितले.