नवी दिल्ली: इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत बूट फेकणारी व्यक्ती गांधी कुटुंबियांची निकटवर्तीय असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ संघटनेने पत्रकार परिषद उधळणारा जगदीश शर्मा याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी यांच्या समवेत छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
शर्मा आणि त्याच्या दोन साथीदारांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांची पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला होता.
शर्मा हा गांधी कुटुंबाच्या जवळचा असून त्याला आमची पत्रकार परिषद उधळण्यासाठी पाठविण्यात आले. यावरून नेहरू- गांधींचे वारसही आम्हाला धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पंक्तीत जाऊन बसले असे समजावे काय; असा उपरोधिक सवालही प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. आपल्या आरोपाचे काँग्रेसने खंडन करावे; अन्यथा यापुढे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यावर होणारा प्रत्येक हल्ला हा काँग्रेसने घडवून आणला; असे समजण्यात येईल; असा इशाराही संघटनेने दिला आहे.
शर्माने मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. आपण काँग्रेस कार्यकर्ता आहोत. मात्र नेता नाही. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची अशा अनेक कार्यकर्त्यांसह छायाचित्र असतात. त्यावरून त्यांनी मला केजरीवालांची पत्रकार परिषद उधण्यास सांगितल्याचा निष्कर्ष काढणे अयोग्य आहे; असे स्पष्टीकरण शर्मा याने दिले.