आयआरबीच्या पुणे कार्यालयावर सीबीआयचा छापा

पुणे: तळेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणी आयआरबी इन्फ्रास्ट्क्चर्सच्या पुणे येथील कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने शुक्रवारी छापे घातले. कंपनीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर यांची या गुन्ह्याच्या तपासात पोलीग्राफ चाचणी घेण्यात आली असून त्याचे अहवाल गुप्त ठेवण्यात आले आहेत. सध्या आयआरबी कंपनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी ‘सख्य’ असल्यावरून वादग्रस्त ठरली आहे.

शेट्टी यांचा जानेवारी २०१० मध्ये खून करण्यात आला. त्यापूर्वी शेट्टी यांनी कंपनी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील १२०० एकर शासकीय जागा हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करीत असल्याची तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांकडे दाखल केली होती.

शेट्टी यांच्या खुनाचा स्थानिक पोलिसांकडून झालेला तपास संशयास्पद असल्याचा आरोप करून शेट्टी यांचे बंधू संदीप यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपविला. सीबीआयने या प्रकरणाच्या प्राथमिक माहिती अहवालात म्हैसकर यांचा समावेश करून सीबीआयने याप्रकरणी म्हैसकर यांच्यासह स्थानिक पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची पोलीग्राफ चाचणीही केली आहे.

Leave a Comment