चेटकीण असल्याचे ठरवून सरपंच महिलेचे नाक कापले

बिहार दि.१ – सत्तर वर्षांच्या सरपंच महिलेचे ती चेटकीण असल्याचे ठरवून नाक कापल्याची घटना बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील कैनझारी खेड्यात घडली आहे. ही महिला दलित आहे. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

या संबंधीची हकीकत अशी की सदर महिला सरपंच म्हणून गावात निवडून आली होती. मात्र गावातील दोन व्यक्ती आजारी पडल्यानंतर तिने चेटूक केल्यानेच त्या आजारी पडल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आणि त्या दोघांनाही बरे करण्याचा आदेशही दिला देण्यात आला. मात्र ती आजार्‍यांना बरे करू न शक ल्याने गावातील लोकांनी तिला बांबू आणि गजाने मारहाण केली आणि धारदार शस्त्राने तिचे नांक कापले. हल्ला करणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस उपसुपरिटेंडेंट अशोक कुमार सिंग यांनी सांगितले.

चेटकी ठरवून ठार करण्याच्या अनेक घटना बिहारमध्ये यापूर्वीही घडल्या असून मानवी हक्क आयोगाने विच हंटिग अॅक्ट १९९९ नुसार दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.