भारताला ’निलम’ वादळाचा धोका

चेन्नई, ३१ ऑक्टोबर-तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निलम नावाचे हे वादळ बुधवारपर्यंत तामिळानाडू, आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनार्‍यावर धडकण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

याचाच परिणाम म्हणून चेन्नई, कांचीपुरम, क्युड्डालोर आणि विल्लुपुरम परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस म्हणजे निलम वादळाचे संकेत असल्याचे कळते.

तामिळनाडूच्या किनारी भागातील चेन्नई, कांचीपुरम, कुड्डलोर आणि विल्लूपुरम येथे आज सकाळपासूनच सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस सुरू आहे. यात उद्या ’नीलम’ वादळाची भर पडणार आहे. हे वादळ सर्वात आधी नागपट्टनम आणि नेल्लोरच्या किनार्‍यांवर धडकेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आजच तामिळनाडूतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बंगालच्या खाडीच्या दक्षिण पश्चिम भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा काल पश्चिमेकडे सरकला. त्यामुळे आता हे वादळ चेन्नईपासून ५०० किलोमीटरवर येऊन पोहोचले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आंध्र प्रदेश सरकारने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून कृष्णा जिल्ह्यात आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या चेन्नई, पाँडिचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांना या वादळाचा सामना करावा लागणार आहे. येत्या बारा तासात वादळाचा जोर आणखी वाढण्याचही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
६५ किमी वेगाने वारे वाहणार

कमी दबावाच्या पट्ट्यामुळे सध्या ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने हवा वाहत आहे. पुढील १२ तासांत उत्तर तामिळनाडू, पुड्डुचेरी आणि दक्षिण आंध्रच्या सागरी किनार्‍यावर हवेची गती तासाला ६५ कीलोमीटर इतकी होण्याची भीती व्यत्त* करण्यात येत आहे. या वेळात समुद्रात मोठ्या लाटा येणार असल्यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या किनार्‍यावर धडकलेल्या सँडी वादळाने आतापर्यंत १६ जणांचा बळी घेतला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा ते पावणे सातच्या दरम्यान हे वादळ न्यूजर्सीच्या किनार्‍यावर धडकले. पण त्याआधीच न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क या दोन्ही शहरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.