गडकरी प्रकरणी संघाने हात झटकले

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांचे अध्यक्षपद ही पक्षाची अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी गडकरी प्रकरणी हात झटकले आहेत.

गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र हा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचे सांगत हात झटकणे पसंत केले. गडकरी पक्षाध्यक्ष राहणार की त्यांची खुर्ची जाणार; याच्याशी संघाला काही देणे घेणे नाही; असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान गडकरी यांच्या आरोप करणारे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी गडकरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. गडकरी यांनी विदर्भात बेकायदेशीर रीतीने जमीन हडपल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे गडकरींच्या कंपनीला १६५ कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या आयआरबी या कंपनीला गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रस्ते बांधण्याचे कंत्राट दिले; असाही आरोप गडकरींवर केला जात आहे.