भारत हा चोरांचा देश: न्या. काटजू

पाटणा: देशातील वाढता भ्रष्टाचार, नेतृत्वहीनता यामुळे भारत हा चोरांचा देश झाला आहे; अशी परखड टीका प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी केली.

भारतात द्रष्टे नेतृत्व, निष्ठा आणि लक्ष्य निर्धारित करण्याची क्षमता या गुणांचा अभाव असल्याने देशाची दुर्दशा झाल्याचे न्या. काटजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारतात एकेकाळी महात्मा गांधी, डॉ. राजेन्द्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बी सी राय यांचे नेतृत्व लाभले. त्याकाळी लोकांमध्ये नेत्यांबद्दल निष्ठा होती. नेतेही द्रष्टे आणि कर्तृत्ववान होते. सध्या नेत्यांमध्ये नेतृत्वगुण आणि लक्ष्याचा अभाव आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे देश ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. घोटाळे, भ्रष्टाचार आणि राजकारणाला लोक कंटाळले आहेत; अशे टीका करून काटजू म्हणाले की; राजकारणी आणि नेत्यांनी आपली कार्यप्रणाली बदलली नाही तर त्यांना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल.