टिव्ही पाहणार्‍यांचे आयुष्य होतेय कमी

मेलबोर्न – इडियट बॉक्स अशी संभावना करण्यात आलेल्या टिव्हीचे फायदे काय असतील ते असोत, त्यातून कुणाच्या ज्ञानात काय भर पडत असेल ती असो पण १ तास टिव्ही पाहणार्‍यांचे आयुष्य २२ मिनिटांनी कमी होते असा दावा ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केला आहे.

या संशोधकांनी दररोज सहा तास टिव्ही पाहणारे आणि अजिबात टिव्ही न पाहणारे हा बेस धरून हे संशोधन केले. त्यात त्याना असे आढळले की अशा २५ वर्षांवरील नागरिकांची आकडेवारी पाहिली असता टिव्ही न पाहणार्‍यांच्या तुलनेत पाहणार्‍यांचे आयुष्य कमी होत जाते आहे. यासाठी संशोधकांनी नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक यांचा डेटा वापरला. त्यात मधुमेही, स्थूल आणि बैठी जीवनशैली असणार्‍यांचाही अभ्यास करण्यात आला. 

कमी शारीरिक हालचाल, धुम्रपान आणि स्थूल लोकांना अनेक त्रास भोगावे लागतात पण त्यापेक्षा अधिक त्रास तासन तास टिव्ही पाहणार्‍यांना भोगावे लागतात असेही या संशोधनात आढळले. टिव्हीत वेळ गेल्यामुळे शरीराला हालचाल मिळत नाहीच पण अबरचबर खाण्याचे प्रमाणही वाढते त्यातही अनहेल्दी खाणे अधिक प्रमाणात हे लोक सेवन करतात व परिणामी अनेक व्याधींची शिकार होतात. याचा थेट परिणाम आयुष्यमान कमी होण्यावर होतो असे या संशोधकांचे म्हणणे असून हे संशोधन ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्टस मेडिसिन मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.