मँगो बाईट्सवरील कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान

ठाणे: पारले बिस्किट्सचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या ‘मेंगो बाईट्स’च्या एका पूर्ण लॉटच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयाला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मानवी आरोग्याला घातक अशा कोणत्याही रसायनाचा वापर कंपनीने केला नसल्याचा उत्पादकांचा दावा आहे.

एफडीआयच्या कोकण विभागीय कार्यालयाला मिळालेल्या माहितीनुसार मँगो बाईटच्या उत्पादनात लेक्टीक अ‍ॅसिड या प्रतिबंधित रसायनाचा वापर केला जातो. त्यानुसार एफडीआयच्या पथकाने भिवंडी येथील गोदामावर धाड घातली. त्याठिकाणी दीड कोटी रुपयाच्या कच्च्या मालासह सुमारे १० लाख रुपये किंमतीचे प्रतिबंधित रसायनही सापडले. हा सर्व माल जप्त करून त्याचे नमुने रासायनिक पृथ्थकरणासाठी पाठविण्यात आले आहेत. कंपनीचे गोदाम सील करून त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

मात्र लॅक्टिक आम्लाच्या खाद्यपदार्थात वापराने मानवी आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे. रोजच्या वापरातील दही, दुधाची पावडर आणि ब्रेड अशा पदार्थात या आम्लाचा वापर होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment