नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि रिअॅल्टी कंपनी डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहारांची चौकशी टाळण्यासाठीच हरियाणाच्या नोंदणी महासंचालक आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांची बदली करण्यात आल्याचा आरोप करून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी या बदलीचा निषेध केला आहे.
हरियाना सरकारने ज्येष्ठ सनदी अधिकारी; राज्याचे नोंदणी महासंचालक आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक अशोक खेमका यांची ३ महिन्यात तडकाफडकी बदली केली आहे.
खेमका यांनी गुरगाव, फरीदाबाद, पालवल, मेवात या ठिकाणच्या सन २००५ पासूनच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश तीन दिवसापूर्वीच जारी केले आहेत.
वढेरा यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळेच हरियाना सरकारने त्यांची बदली केल्याचा आरोप करून केजरीवाल यांनी सरकारला वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे.
खेमका यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून आपल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या पत्राबाबत माहिती देण्यास खेमका यांनी नकार दिला असला तरीही २१ वर्षाच्या सेवाकाळात झालेल्या ४० बदल्या आपल्यासाठी वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.