अशोक चव्हाणांचे पुनर्वसन होण्याचे संकेत

मुंबई दि.१६ – नांदेड महानगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळविल्यामुळे अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात महत्त्वाची भूमिका दिली जाईल असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीच असे संकेत दिले आहेत. अर्थात अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणात आरोप झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना २०१० मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आजही त्यांच्यावरचा हा खटला सुरू असला तरी त्याची फारशी फिकिर नाही असे काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्यावर दाखल असलेल्या अन्य केसेस मधून मात्र त्यांनी सहीसलामत बाहेर पडणे गरजेचे आहे. अर्थात जो पर्यंत ते केंद्रात अथवा राज्यात सत्तेत सहभागी होण्याची जबाबदारी स्वीकारत नाहीत तोपर्यंत हा मुद्दा गैरलागू असल्याचेही या वरीष्ठांचे म्हणणे आहे. आणि पक्षात संघटनात्मक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यास कोणाचीच हरकत नाही असेही सांगण्यात येत आहे.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मराठवाड्यात कोणीतरी भक्कम नेता काँग्रेसला हवा आहे. कारण राष्ट्रवादी सातत्याने आणि हर उपायांनी या भागात आपला बेस भक्कम करण्याचे प्रयत्न करत आहे. नांदेड महापालिकेत चव्हाण यांनी मिळविलेल्या विजयामुळे काँग्रेसच्या या भागात वर्चस्व राखण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत व यामुळेच चव्हाणांवर मराठवाड्याची जबाबदारी सोपविली जाईल असे संकेत दिले जात आहेत.

 

Leave a Comment