जगभरात वंडर मटेरियल म्हणून ओळखल्या जात असलेल्या ग्राफेट मटेरियलपासून कागदासारखे पातळ आणि लवचिक स्मार्टफोन भविष्यात बनविले जातील असे संशोधकांचे म्हणणे असून यावर अधिक संशोधन सध्या सुरू आहे.
भविष्यात स्मार्टफोन कागदासारखे पातळ आणि लवचिक
ग्राफेन हे मटेरियल जगातील सर्वाधिक मजबूत मटेरियल म्हणून ओळखले जाते. ते पोलादापेक्षा १०० पट अधिक मजबूत आहेच पण १ औंस मटेरियल मध्ये २८ फूटबॉल मैदाने कव्हर करता येतील इतके पातळही होऊ शकते. हे मटेरियल स्मार्टफोन क्षेत्रात क्रांती घडवेलच पण सोलर पॅनल्स व अन्य क्षेत्रातही ते क्रांती घडवू शकणार आहे. तांब्याप्रमाणेच ते वीजवाहक आहे आणि अत्यंत लवचिक आहे. त्यामुळे सेलफोनचा टनस्क्रीन बनविण्यात ते उपयुक्त आहे तसेच अतिशय पातळ असल्याने पारदर्शक सोलर सेल्स बनविता येणार आहेत. इलेक्ट्रीक कार अथवा हायब्रिड कारवर ते सोलर पॅनल मोल्ड म्हणूनही वापरता येणार आहे असाही संशोधकांचा दावा आहे.
अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ऑफिस ऑफ पब्लिक अफेअर्सतर्फे या मटेरियलच्या उपयुक्ततेसंदर्भातला व्हिडीओ नुकताच सादर करण्यात आला. त्याचे अविश्वसनीय गुणधर्म पाहून सारेच अचंबित झाले. विशेष म्हणजे हिरा अथवा कोळश्याप्रमाणेच हे मटेरियलही पूर्ण कार्बन पासूनच बनले आहे. वैद्यकीय संशोधकांच्या मते याचा उपयोग मणक्याच्या इजेच्या उपचारांमध्येही होऊ शकतो.
