पेशावर दि.११ – तालिबान्यांनी मलाला युसुफझाई या चौदा वर्षांच्या मुलीच्या डोक्यात गोळ्या घातल्याच्या घटनेचा निषेध जगभरातून केला जात असतानाच तिच्यावर हल्ला करणार्यांची माहिती देणार्यास १ कोटी रूपयांचे ईनाम देण्यात येईल असे खैबर पख्तूतखवा प्रांत सरकारने जाहीर केले आहे. प्रांताचे माहिती मंत्री मिया इफ्तकार हुसेन यांनी ही घोषणा केली असून माहिती देणार्याचे नांव गुप्त राखले जाईल असेही सांगितले आहे. जगभरातून या हल्ल्याचा झालेला निषेध आणि मलाला हिला मिळालेला पाठींबा म्हणजे तालिबान्यांना जगाने मारलेली थप्पड आहे असेही ते यावेळी म्हणाले.
मलाला हल्ला – माहिती देणार्यास १ कोटींचे इनाम
पाश्चात्य विचारसरणी असलेल्या मलाला च्या डोक्यात काल गोळ्या घालण्यात आल्या होत्या आणि त्यात ती गंभीर जखमी झाली होती. मात्र तातडीने तिच्यावर शस्त्रक्रिया करून मणक्यात शिरलेल्या गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. तिची प्रकृती आता सुधारत असल्याचेही सांगण्यात आले असून गरज भासल्यास अमेरिका व ब्रिटन येथील न्यूरोतज्ञ तिच्यावर उपचारासाठी सज्ज आहेत असेही समजते.
दरम्यान फेडरल इंटेलिजन्स मंत्री रहमान मलिक यांनी हल्लेखोरांची ओळख पटली असल्याचा दावा केला आहे. अफगाण प्रोव्हीन्समधील कुनर येथून हे हल्लेखोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी २०० जणांना आत्तापर्यंत ताब्यात घेतले असून त्यात मलाला च्या शाळेचा ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. बंदी असलेल्या तारिक ए तालिबान संघटनेने या हल्याची जबाबदारी स्वीकारली असून मलिलाला भविष्यात संपूर्ण संरक्षण देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
