चौतालांचा बांका उपाय

हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या विशेषतः सामूहिक बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. समाजामध्ये घडणार्‍या अशा घटना कोणत्याही सुजाण, सामान्य माणसाला चितेच्या वाटत असतात. त्यामुळे अशा प्रकाराच्या विरोधात सरकार काही हालचाली करत नसले की, जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण होतो. म्हणूनच असेल कदाचित पण सोनिया गांधी यांनी या निमित्ताने हरियाणाला भेट दिली. सामूहिक बलात्कारा नंतर आत्महत्या केलेल्या एका दलित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेऊन सोनिया गांधी यांनी त्यांचे सांत्वन केले. परंतु सोनिया गांधी यांना हरियाणामध्ये आपल्या पक्षाचे सरकार आहे आणि त्यामुळे आपल्या पक्षाची बदनामी होईल की काय, अशी भीती वाटली असावी. म्हणून त्यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, बलात्काराच्या घटना केवळ हरियानातच घडतात असे नाही तर सर्वत्र घडतात, असे उद्गार काढले. सोनिया गांधी यांची राजकीय, सामाजिक समज ही बेतास बात आहे हे सर्वांना आता माहीत झालेले आहे. त्यामुळे अशा दुःखद प्रसंगी आपण काय बोलले पाहिजे याचे भान त्यांना राहिले नाही. या घटनेकडे त्या अजूनही पक्षीय दृष्टीकोनातूनच बघतात हे लक्षात आले.

त्यांनी या कुटुंबाला भेट दिली यामागे माणुसकी नसून पक्षीय दृष्टीकोनच आहे, हेही त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात आले. त्यांनी एका दलित कुटुंबाविषयी सहानुभूती वाटली म्हणून भेट दिलेली नाही तर काँग्रेसचे राज्य असलेल्या राज्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडून सुद्धा पक्षाच्या अध्यक्षा तिकडे फिरकल्या सुद्धा नाहीत असे कोणी म्हणू नये म्हणून त्यांनी भेट दिलेली आहे. उत्तर प्रदेशामध्ये मायावती मुख्यमंत्री असताना अशाच बलात्काराच्या घटना सलग घडल्या होत्या. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी त्या घटनांचा निषेध अतीशय असभ्य पद्धतीने केला होता आणि सरकारला जबाबदार धरले होते. अशाच घटना हरियाणात घडल्या तेव्हा मात्र सोनिया गांधी या घटनांना हरियाणाच्या सरकारला जबाबदार धरायला तयार नाहीत. बलात्कार हा एक मानवी संस्कृती वरचा कलंक आहे. परंतु त्याकडे सोनिया गांधीसारख्या जबाबदार नेत्या सुद्धा कशा चुकीच्या दृष्टीकोनातून बघत असतात हे यावरून लक्षात येईल.

सोनिया गांधी यांच्या पेक्षा सुद्धा माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी अधिक बेजबाबदारपणा दाखवला आहे. चौताला यांनी तर मोठे समाजशास्त्रज्ञ असल्याचा आव आणून बलात्काराच्या घटनांवर आपल्या बुद्धीनुसार उपाय सुद्धा सुचवून टाकला आहे.

सरकारने मुलांचे विवाहाचे किमान वय २१ वर्ष आणि मुलीचे किमान वय १८ वर्षे ठरवले आहे. ते अनुक्रमे १८ आणि १६ वर्षे करावे, म्हणजे बलात्काराच्या घटना कमी होतील असा विचित्र शोध ओमप्रकाश चौताला यांनी लावला आहे. त्यांचे हे विश्लेषण आणि उपाय किती विचित्र, असामाजिक आणि अशास्त्रीय आहे हे तर सांगणे आवश्यक आहेच. पण त्या मागचा हेतू नेमका काय आहे, हे आधी जाणले पाहिजे. कारण ओमप्रकाश चौताला हे कितीही आव आणत असले तरी ते काही समाजशास्त्रज्ञ नाहीत, ते राजकीय नेते आहेत आणि हरियाणामध्ये जाट समाजाच्या जात परिषदा असेच अनेक उपाय सुचवीत असतात. या परिषदा आणि संघटना यांना खाप असे म्हणतात. ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय करणार्‍या जाट समाजाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खाप पंचायतींचा मोठा पगडा आहे. या पंचायतींमध्ये निर्णय करणारे जाट समाजातले नेते अतीशय प्रतिगामी विचारांचे आणि प्रामुख्याने अशिक्षित आहेत. ते लोक अशा प्रकारचे उपाय सुचवीत असतात आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी सरकार करत असलेल्या नवनवीन कायद्यांना नेहमी विरोध करीत असतात. अशा या खाप पंचायतींना खूष करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी चौताला यांनी खाप पंचायतीची ही भूमिका उचलून धरली आहे.

आता बलात्काराच्या घटनांमध्ये लवकर विवाह केल्याने कशी घट होणार आहे याचे विश्लेषण चौताला यांनीही केलेले नाही आणि तसे ते उपलब्धही नाही. कारण  वयाच्या १८ आणि २१ व्या वर्षी होणारे विवाह हे मुळी बलात्काराचे कारणच नाही. ज्या लोकांनी बलात्कार केलेले आहेत तेही विवाहित आहेत आणि ज्यांच्यावर बलात्कार झाले त्या महिलाही विवाहित आहेत. तेव्हा या लोकांची लग्ने आणखी चार-दोन वर्षे आधी झाली असती तर या बलात्काराच्या घटना घडल्याच नसत्या असे म्हणण्यास थोडासाही वाव नाही. बलात्काराचे कारणच शोधायचे असेल तर बलात्काराला बळी पडलेल्या महिला या दलित समाजातल्या आणि गरीब आहेत. तसेच बलात्कारी प्रवृत्तीचे पुरुष आणि मुले ही श्रीमंता घरची, उच्चवर्णीय आहेत. त्या तरुणात एकाही दलित तरुणाचा समावेश नाही. या तथ्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि बलात्कार टाळायचेच असतील तर बलात्कार करणार्‍या धनदांडग्या लोकांना पोलिसांचा वचक बसवावा लागेल. पोलीस यंत्रणेमध्येच बलात्काराविषयी चीड नाही, ही खरी समस्या आहे. चौताला यांनी ती लक्षात घेतली पाहिजे.

Leave a Comment