आंध्रात भारती-वॉलमार्टची सहा स्टोअर

भारती वॉल मार्ट या जॉईंट व्हेंचरने बुधवारी आंध्रात पहिले मॉडर्न  बेस्ट प्राईज होलसेल स्टोअर सुरू केले असून या वर्षअखेरीपर्यंत आणखी एक व भविष्यकाळात आणखी चार अशी सहा स्टोअर्स सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज जैन याविषयी माहिती देताना म्हणाले की केंद्राने ५१ टक्के पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे हे मॉडर्न होलसेल कॅश अॅन्ड कॅरी स्टोअर सुरू करण्यात आले असून ५३ हजार चौ.फूट जागेत हे स्टोअर आहे. येथे दररोज दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या असून सुमारे ५ हजार वस्तूंचा त्यात समावेश आहे. याचा फायदा जसा सर्वसामान्य ग्राहकाला होणार आहे तसाच तो रेस्टॉरंट मालक, हॉटेलचालक, केटरर, फळ व भाजी विक्रेते, किराणा दुकानदार यांनाही होणार आहे.

या दुकानात किराणा माल, भुसार माल, इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, फळे, भाज्या, कार्यालयानी सामग्री, घर आणि वैयक्तीक वापराच्या वस्तू अशा अनेक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्या बाजारापेक्षाही कमी किंमतीत मिळणार आहेत. त्याचबरोबर ४०० हून अधिक खासगी लेबल ब्रँडच्या वस्तूही येथे उपलब्ध असून ही उत्पादने देशातील ब्रँडेड वस्तूंशी स्पर्धा करू शकतील अशा दर्जाची आहेत. शिवाय ती ३० टक्के स्वस्तही आहेत. शेतकरीही येथे आपला माल स्वतः विकू शकतील किवा आमच्यामार्फतही विकू शकतील. सहा दुकानांसाठी २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत असून प्रत्येक स्टोअरसाठी ४० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे असेही जैन म्हणाले.