आपोआप चालणारी अद्भूत कार

वॉशिंग्टन दि.२७ – आरामदायी, अत्यंत सुरक्षितपणे इच्छीत स्थळी  नेणारी, अपघाताची शक्यता जवळजवळ नसलेलीच आणि बटन दाबताच स्वतःहूनच चालणारी कार असेल तर काय धमाल येईल ना ? संशोधकांचे प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे ही स्वप्नवत वाटणारी गाडी २०१५ पर्यंत प्रत्यक्षात अवतरणार असून वाहन उद्योगातील बलाढ्य कंपनी जनरल मोटर्सच ही कार बाजारात आणत आहेत. या कारची निर्मिती आता अंतिम टप्प्यात असून ही सेमी ऑटोनोमस कार  लेन पाळेल, धोका जाणवल्यास दूर जाईल, ब्रेक लावायची गरज असेल तर ब्रेक लावेल असे कंपनीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग) डॉन बटलर यांनी जाहीर केले आहे.

याविषयी अधिक सांगताना ते म्हणाले की ही कार बनविताना वाहनाचे सर्व नियंत्रण खुद्द वाहनच घेऊ शकेल अशा पद्धतीने ती बनविली गेली आहे. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे ही कार घेऊन जाईल केवळ एक बटण दाबायचे काम आपण करायचे आहे. या सुपर क्रूझ गाडीत रडार, कॅमेरा, जीपीएस सिस्टीम बसविल्या गेल्या आहेत. त्यामुळे कारचालक अथवा कारमालक आरामात प्रवास करू शकणार आहेतच पण हातात व्हिल नसल्याने आणि ब्रेकवर पाय ठेवायची गरज नसल्याने प्रवासाचा आनंद खिडकीतून बाहेर पाहताना पुरेपूर लूटू शकणार आहेत. पुढची कार हळू जातेय असे दिसल्यास ही गाडी स्वतःचा वेगही कमी करेल आणि धडक होण्याची भीती राहणार नाही.

अर्थात चालकाला गाडी स्वतः चालवावीशी वाटेल तेव्हा तो या गाडीचे नियंत्रण एका क्षणात स्वतःकडे घेऊ शकेल अशीही सोय यात आहेच. फक्त त्यासाठी आणखी तीन वर्षे वाट पाहायला लागणार आहे इतकेच.

 

Leave a Comment