मुलायमसिंग यांची वाकडी चाल

नवी दिल्ली: केंद्र सरकार अडचणीत आल्यावर बाहेरून पाठिंबा देऊन दिलासा देणार्‍या समाजवादी पक्षाने आपल्या दुटप्पी धोरणाने पुन्हा सरकारला आणि विरोधकांनाही बुचकळ्यात पाडले आहे. आता रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला विरोध करणारे विधेयक संसदेत आणणार असल्याची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे.

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक, डीझेल दरवाढ आणि सिलेंडरचे रेशनिंग या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. संयुक्त पुरोगामी आघाडीत दुसर्‍या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या तृणमूल काँग्रेसने सरकारचा पाठींबा काढून घेतला. सर्वसामान्य जनतेतही या निर्णयांबद्दल तीव्र असंतोष आहे. या निर्णयांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या भारत बंदमध्ये सक्रीय सहभागी होऊन सपने उत्तर प्रदेशात मोठे आंदोलनही केले. मात्र दुसर्‍या दिवशी तांत्रिक दृष्ट्या अल्पमतात आलेल्या सरकारला बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा करून मुलायम सिंगांनी सरकारला दिलासा दिला.

आता मात्र हेच मुलायम सिंग संसदेत थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्याची भाषा करीत आहेत. विदेशी गुंतवणूक, डीझेल दरवाढ आणि सिलेंडर रेशनिंग याचा बचाव करण्यासाठी पंतप्रधान यांनी केलेली विधाने ही विश्वासार्ह नसल्याचा आरोप करीत सपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.