मुंबई, दि. २२ – भारतीय उद्योग महासंघा (सीआयआय) तर्फे कॉमनवेल्थमधील आशियाई देशांच्या तरूण उद्योजकांची एक परिषद ‘काये’ या संघटनेने आयोजित केली असून ती १३ ते १५ डिसेंबर या काळात मुंबईत भरणार आहे. या परिषदेला काये यंग आंत्रप्रुनिअर समिट असे नाव देण्यात आले असून ही परिषद यंदा प्रथमच भरत आहे.
आशियातील तरूण उद्योजकांसाठी परिषद
कॉमनवेल्थ एशिया अलायन्स ऑफ यंग आंत्रप्रुनिअर म्हणजेच ‘काये’ या संघटनेची स्थापना कॉमनवेल्थ यूथ प्रोग्राम- एशिया सेंटर व सीआयआय यंग इंडियन्स या दोन संस्थांनी नवी दिल्लीत येथे केली आहे. डिसेंबरमध्ये होणार्या या परिषदेसाठी योग्य तरूण उद्योजकांचा शोध घेणे सीआयआयने सुरू केले आहे. यंदाच्या परिषदेचा मुख्य विषय तरूण उद्योजकतेसाठी वातावरण निर्मिती हा आहे. या परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तान, बांगलादेश, ब्रुनई, दारूल-ए-सलाम, भारत, मालदीव, सिंगापूर व श्रीलंका या कॉमनवेल्थ आशिया गटातील देशांच्या २०० हून अधिक तरूण उद्योजकांच्या एकमेकांना परिचय होणार आहे. याचा फायदा या उद्योजकांमधील व पयार्याने या देशांमधील व्यावसायिक बंध निर्माण होण्यासाठी, उद्योगविषयक गती मिळविण्यासाठी, एकमेकांच्या प्रदेशात व्यापारउदीम वाढविण्यासाठी होणार आहे. या परिषदेच्या नावनोंदणीला सुरूवात झाली आहे. यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात आली असून याचे अनावरण कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट, लंडनच्या यूथ अफेअर्स विभागाच्या संचालक कॅथरिन एलिम यांच्या हस्ते झाले.
