टी-२० विश्वचषक – भारतासमोर इंग्लंडचे आव्हान

श्रीलंका, दि. २२ – श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या गटातील दुसरा सामना रविवारी इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. सुपर एट सुरू होण्यापूर्वी  भारतीय गोलंदाजांना आपली कामगिरी सुधारण्याची चांगली संधी या सामन्याच्या निमित्ताने मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरूद्ध विजय मिळवित यापूर्वीच सुपर एटमध्ये प्रवेश केला असला तरी दोन्ही संघ रविवारी आपली ताकद पणाला लावून खेळतील. अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात झालेल्या चुका भारतीय संघ सुधारण्याचा प्रयत्न करील. तसेच विजयाची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

भारतीय संघाची गोलंदाजी ही संघाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. भारतीय गोलंदाजीची धुरा वाहत असलेला ३३ वर्षांचा झहीर खान कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तसेच त्याच्याकडून म्हणावी तशी कामगिरी होताना दिसत नाही. झहीरच्या या खराब कामगिरीमुळे एकंदर भारतीय गोलंदाजी प्रभावहीन ठरत आहे. त्याशिवाय कर्णधार महेंद्रसिह धोनी हा फक्त चार गोलंदाजांना खेळवितो. त्यामुळे संघ  अडचणीत सापडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय पार्ट टायमर्स गोलंदाजांनी नेहमीपेक्षा चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा असते. इरफान पठाण आणि लक्ष्मीपती बालाजी हे दोघेही झहीर खानपेक्षा चांगली गोलंदाजी करीत आहेत. आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टीही जलदगती गोलंदाजांना मदत करणारी आहे. पण भारतीय संघ हा आपल्या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून आहे. हे लक्षात घेता या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज तसेच फलंदाज काय कामगिरी करतात याकडे सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment