मुंबई, दि. २२ – सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्यांसाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए)नवी नियमावली जाहीर केली आहे. या कंपन्यांना शेअर बाजारात उतरायचे असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे किमान १० वर्षांचा अनुभव व आयआरडीएची पूर्वसंमती हवी, अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. जीवनविमा व्यतिरिक्त कंपन्यांसाठी ही तत्वे जारी करण्यात आली आहेत.
विमा कंपन्यांसाठी नवी नियमावली
या कंपन्यांना समभाग विक्री करायची असेल तर त्यांनी सेबीकडे जाण्यापूर्वी आयआरडीएची परवानगी घेणे आवश्यक आहे. आयआरडीए संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, तिचे भांडवल व नियामक इतिहास याची पडताळणी करून घेईल. त्यानंतरही प्रवर्तकांनी त्यांचा किती हिस्सा बाजारात आणावा व परकीय गुंतवणूकदारांना किती समभाग विकावेत, याबाबतचा निर्णयही आयआरडीएने राखून ठेवला आहे. शेअर विक्रीनंतर प्रवर्तकांनी किती काळाने त्यांचे शेअर विकावेत, यासाठीचा किमान बंधनकारक कालावधीही आयआरडीए निश्चित करील, असे या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित कंपन्यांचा भांडवली बाजारात उतरण्याचा हेतू कायम आहे का, हेही आयआरडीए तपासून पाहाणार आहे. आयआरडीएने एखादा प्रस्ताव मंजूर केला तरी त्यांची वैधता एक वर्षाचीच असेल. या संदर्भात आयआरडीएने येत्या ३० तारखेपर्यंत सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत.
