प्रत्येकाला कधी ना कधी इंजेक्शन घेण्याची वेळ येतेच. अगदी जन्मल्यापासून या इंजेक्शनचा सिलसिला सुरू होत असतो तो मरेपर्यंत. इंजेक्शनची नुसती सुई बघूनच अनेकांना चक्कर येते. इंजेक्शनच्या वेदना सहज सहन करणारा माणूस तसा विरळाच म्हणायला हवा. मात्र मानवजातीसाठी अखंड कोणते ना कोणते संशोधन करणार्या संशोधकांमुळे आता वेदनारहित इंजेक्शन उपलब्ध झाले आहे.
लेसरच्या मदतीने वेदनारहित इंजेक्शन
दक्षिण कोरियातील सेऊल नॅशनल विद्यापीठातील संशोधकांनी हे इंजेक्शन विकसित केले असून त्यात लेझरचा उपयोग करण्यात आला आहे. इंजेक्शनच्या सिरिंजमधून सोडण्यात येणारे औषध मायक्रोस्कोपिक जेटस स्वरूपात त्वचेत सोडले जाते. औषधाचा अत्यंत सूक्ष्म प्रवाह योग्य दाबाच्या सहाय्याने त्वचेत सोडला जात असल्याने वेदना होत नाहीत. फेशियल ट्रिटमेंटसाठी लेसरच्या उपयोग पूर्वीपासूनच केला जात आहे. मात्र इंजेक्शन देताना सिरींजला लेसर अॅडोप्टरची जोड नवीन संशोधनात देण्यात आली असल्याचे संशोधक जॅक यो यांचे म्हणणे आहे.
पातळ स्वरूपात असलेले औषध त्याच्या खाली पाण्याचे चेंबर अशा प्रकारच्या या सिरींजमध्ये पाणी ड्रायव्हिंग फ्लुइड म्हणून काम करते. प्रत्येक लेझर पल्स बरोबर क्षणात हवेचा फुगा तयार होतो या हवेचा दाब पाण्यावर पडल्यावर पाणी औषधाला त्वचेत ढकलते. सिरींजला अत्यंत सूक्ष्म नोझल बसविण्यात आले असून या नोझलमधूनच औषध त्वचेत ढकलले जाते. ही नोझल मानवी केसापेक्षा किंचित जाड आहेत. त्वचेच्या वरच्या थरातच हे नोझल जाते आणि त्वचेच्या सर्वात वरच्या थरात मज्जातंतू नसतात त्यामुळे वेदना समजत नाहीत.
सध्या हे इंजेक्शन थोडे महाग असले तरी सिरींज उत्पादन कंपन्यांशी सहकार्य करार करून त्या स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इंजेक्टर रिप्लेसिबल असल्याने खर्चात कपात होतेच पण लहान मुलांच्या लसीकरणासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असे यो यांचे म्हणणे आहे.
