पाकिस्तानात रेल्वे टक्कर – दोन ठार

कराची दि.१७ – कराचीपासून ५० किमीवर असलेल्या बिन कासीम या गावाजवळ आज पहाटे चारच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर १०० हून प्रवासी जखमी झाले.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार बिन कासीम स्टेशनजवळ रूळावरच उभी असलेल्या मिलत एक्स्प्रेसला शालिमार एक्स्प्रेसने धडक दिली. तांत्रिक चुकीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही गाड्या रूळावरून खाली घसरल्या. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी अर्धवट झोपेतच होते. अपघाताचे वृत्त कळताच तातडीने सुटका पथके घटनास्थळी रवाना झाली आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना कराचीच्या जीना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. अनेक प्रवासी डब्यातच अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment