उत्तर प्रदेशात पुन्हा गुंडाराज

लखनौ दि.१५- उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सहा महिन्यांपूर्वीच हाती घेतलेल्या समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्याबद्दल असलेल्या जनतेच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या असून उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा गुंडाराज आल्याची भावना जनमानसात तयार होताना दिसत आहे. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याची कबुली दिली आहे.

सर्वात तरूण मुख्यमंत्री बनण्याचा मान अखिलेश यांना मिळाला. सुशिक्षित आणि सुधारणावादी असा चेहरा घेऊन मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेल्या अखिलेश यांनी सुरवातीला तरी अनेक घोषणा करून उत्तरप्रदेशाला विकासाच्या दिशेने नेत असल्याचा आव आणला होता. मात्र त्यांचा हा आव किती खोटा आणि तकलादू आहे हे सहा महिन्यांतच सिद्ध झाले आहे. कारण गुन्हा अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार या सहा महिन्यात उत्तरप्रदेशात तब्बल २४३७ खून, ११०० लैंगिक छळाच्या घटना,४५० जबरी चोर्‍या नोंदविल्या गेल्या आहेत. रायबरेली, कोरीकालन आणि अशा अनेक गावांतून वेळोवेळी संचारबंदी पुकारावी लागली आहे.

समाजवादी पक्षाच्या विजयानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकांतूनही हिंसाचार, दंगे आणि गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा दहशतीखाली आली आहे. मात्र या सार्‍यांचा दोष मुख्यमंत्री अखिलेश यांनी पोलिसदलाला दिला आहे. त्यांच्य म्हणण्यानुसार कायदा सुव्यवस्था बिघडली असून याला पोलिसच जबाबदार आहेत. पोलिस विभागात स्वच्छतेची मोहिम म्हणजे भ्रष्टाचारी पोलिसांविरोधात कारवाई सरकारने हाती घेतली असल्याचेही ते सांगत आहेत.

Leave a Comment