ट्विटरच्या चावडीवर थरूर निष्प्रभ

नवी दिल्ली: एकीकडे सोशल मिडीयाचा दुरुपयोग करून भावना भडकावण्याचे उद्योग सुरू असतानाच ट्विटरच्या चावडीवर रंगलेल्या माजी मंत्री शशी थरूर आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांच्या जुगलबंदीने या माध्यमांच्या विधायक उपयोगाचे उदाहरण घालून दिले आहे. कोळसा खाण वाटपाचे समर्थन करणार्‍या थरूर यांना अखेर कोळसा खाणींचा लिलाव हाच योग्य मार्ग ठरला असता हे कबूल करावे लागले.

ट्विटरवर थरूर यांनी कोळसा खाण वाटपाचे समर्थन केले. विद्युत निर्मिती, सिमेंट कारखाने आणि पोलाद उत्पादनासाठी कोळसा खाणीचे वाटप करण्याचे सरकारचे पाऊल योग्यच असल्याचा दावा थरूर यांनी केला. केजरीवाल यांनीही या वादात उडी घेतली आणि अंतर्वस्त्र, गुटखा आणि कॅसेट बनविणार्‍या कंपन्यांना कोळसा खाणी देण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. या कंपन्यांकडून उर्जा उत्पादनाची अपेक्षा तुम्ही कशी बाळगता; असा सवालही त्यांनी केला. यावर निरुत्तर झालेल्या थरूर यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र कोळसा खाणींचा लिलाव हाच योग्य मार्ग ठरला असता हे ही त्यांनी मोकळेपणाने मान्य केले.