नवी दिल्ली: आर्थिक मंदीचा बीपीओ कंपन्यांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. उलट बीपीओ कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वाढच झाली आहे; असे सांगून हिंदुजा उद्योग समूहातील हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स या बीपीओ कंपनीने विस्ताराच्या योजनेबरोबरंच या वर्षात ४ हजार युवकांना नोकरी देण्याचे जाहीर केले.
आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या आपला नियमित खर्च कमी करण्यासाठी आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळण्यासाठी बीपीओ कंपन्यांकडे कामे सोपविण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे मंदीतही बीपीओ कंपन्यांच्या व्यवसायाची वृद्धीच होत असल्याचे हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ सरकार यांनी सांगितले.
कंपनीने नुकतेच जमैका येथे सेवा केंद्र सुरू केले असून लवकरंच लंडन आणि कॅनडा येथेही केंद्र सुरू करणार असल्याचे सरकार यांनी सांगितले. मागच्या आर्थिक वर्षात कंपनीने ४ हजार नवीन कर्मचार्यांना नोकर्या दिल्या असून आगामी आर्थिक वर्षातही ३ ते ४ हजार नोकर्या देणार असल्याचा दावा त्यांनी केला.