लंडन दि.८ – ऐकायला थोडेसे वेगळे किवा कदाचित अशक्यही वाटेल, पण विज्ञान तंत्रज्ञानाने हे सहज शक्य झाले आहे. न परतीच्या प्रवासास गेलेल्या आपल्या जिवलगांच्या स्मृतीशिलेवर (ग्रेव्ह स्टोन) आता बारकोड सिस्टीम बसविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले गेले असून त्यामुळे तुम्ही जेव्हा या ठिकाणी भेट द्याल, तेव्हा मोबाईल स्वाइप करून एका क्षणांत आपल्या या जिवलगांचे फोटो, त्याची सर्व माहिती, त्याच्याबद्दल अन्य लोकांमध्ये असलेल्या भावना तुम्हाला दिसू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर तुम्हीही तुमच्या भावना येथे नोंदवू शकणार आहात. यु.के.तील चेस्टर पीअर्स या फ्युनरल कंपनीचे फ्युनरल डायरेक्टर स्टीफन निम्मो यांनी ही माहिती दिली आहे.
यात ग्रेव्हस्टोनवर चौकोनी बारकोड ग्रॅनाईटवर अथवा धातूच्या पत्र्यावर कोरून बसविला जातो. तुम्ही या स्थळाला भेट द्याल तेव्हा मोबाईलच्या सहाय्याने हा बारकोड स्कॅन केलात की क्विक रिस्पॉन्स देणारा हा बारकोड त्वरीत वेबसाईट ओपन करून दिवंगत व्यक्तीची बायोग्राफीच तुमच्यापुढे सादर करणार आहे. दिवंगत व्यक्तीची सर्व माहिती, फोटो, कुटुंबियांच्या भावनाही मोबाईलवर वेबसाईटच्या थ्रू पाहू शकणार आहात. आपल्या जिवलगांच्या स्मृती या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला जिवंत करता येणार आहेत. विशेष म्हणजे या वेबसाईटवर कमी किवा जास्त, सुलभ किवा किचकट अशी कितीही माहिती देता येणार आहे.वेबसाईटसाठी असलेला पासवर्ड वापरून नवीन माहितीही त्यात वेळोवेळी अॅड करता येणार आहे. अर्थात यासाठी मोजावी लागणारी रक्कम तशी भक्कम आहे. साईटसाठी ३०० पौंड तर सेटअपसाठीचा अतिरिक्त चार्ज म्हणून ९५ पौंड त्यासाठी आकारले जाणार आहेत.