पहिले ड्रीमलायनर एअर इंडियाच्या ताफ्यात

एअर इंडियाच्या ताफ्यात पहिले ड्रीमलायनर म्हणजे बोईंग ७८७ दाखल झाले असून अमेरिकेत हे विमान कंपनीने ताब्यात घेतले आहे.

भारताने अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडे २००८ साली २७ ड्रीमलायनर ची मागणी नोंदविली होती. मात्र बोईंगमधील डिझाईन आणि उत्पादनातील अडचणींमुळे पहिले बोईंग मिळायलाच तब्बल चार वर्षे उशीर झाला आहे. त्यासाठी बोईंगकडे नुकसानभरपाईची मागणीही करण्यात आली असून हा मसुदा अंतिम मंजुरीसाठी कायदा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या कांही आठवड्यात आणखी काही विमाने ताब्यात मिळणार असून मार्च २०१३ पर्यंत १४ विमाने एअर इंडियाला मिळणार आहेत.

२५६ सीटर या विमानात १८ फुलफ्लॅट होणार्‍या बिझिनेस क्लास सीट असून २३८ इकॉनॉमी सीटस आहेत. लाँगरूट सेवांसाठी ही विमाने अतिशय उपयुक्त असून एअर इंडिया या विमानांमुळे ऑस्ट्रेलियासाठी नवी सेवा सुरू करू शकणार आहे. सध्या ही विमाने देशांतर्गत उड्डाणासाठीच वापरली जाणार आहेत. पायलट आणि क्रू मेंबरना चांगला सराव झाला की मग आंतरराष्ट्री उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. ही विमाने वापरणारा जगातील भारत हा तिसरा देश असून जपान आणि इंडोनेशियात ही विमाने वापरात आहेत.

बोईंगच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाचीही विविध मॉडेल्स असून हे विमान १५ हजार किमीचा टप्पा नॉन स्टॉप गाठू शकते. जगातील ४७ विमानक कंपन्यांनी बोईंगकडे ९०० विमानांची मागणी नोंदविली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्बन मटेरियलपासून बनविर्‍यात आलेले हे विमान अन्य विमानांच्या तुलनेत वजनाने हलके असून त्यामुळे २० टक्के इंधन बचत होऊ शकते असेही समजते.