मृतदेहच पटविणार स्वतःची ओळख

मेरठ – अनेकदा अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटविणे कठीण असते. कधी कधी वैज्ञानिक चाचण्यादेखील चूक ठरतात. मात्र आता हे टाळता येण्यासारखे आहे. लाला लाजपतराय मेडिकल कॉलेजच्या अनॉटामी विभागात सुरू असलेले संशोधन फोरेंसिक सायन्ससाठी वरदान सिद्ध होऊ शकते.

एम.डी. च्या विद्यार्थिनी डॉ. शोभा वर्मा यांना संशोधनात असे आढळले की शंभर टक्के जळालेल्या किंवा सडलेल्या मृतदेहाचीदेखील अवस्था व लिंग सहजपणे ओळखले जाऊ शकते. विशेष म्हणजे २००६ मध्ये मेरठमध्ये झालेल्या व्हिक्टोरिया अग्निकांडात जळालेल्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम दीर्घकाळ चालले होते.  डॉ. शोभा यांनी गेल्या तीन वर्षांत मुजफ्फरनगर, व कानपुरला जाऊन सुमारे १५० मृत मानव शरीरांचे, सांगाडे आणि कवट्यांवर संशोधन केले आहे. त्यात त्यांना आढळले की, कानामागे असलेल्या हाडांत निश्चित अंतर असते त्यावरून मृतदेह पुरुषाचा आहे की स्त्रीचा याचा योग्य अंदाज लावला जाऊ शकतो.

विभागप्रमुख डॉ. जी.एल. निगम यांनी सांगितले की, शंभर टक्के जळालेला मृतदेह किंवा सडलेला मृतदेहाच्या कानामागे मेस्टोइट प्रोसेस हाड कोणत्याही परिस्थितीत नष्ट होत नाही. डॉ. शोभा यांनी दिलेल्या माहितीनुसार तुकडे तुकडे झालेल्या मृतदेहाच्या कवटीवरून कानामागे असलेल्या हाडाच्या मोजणीवरून ९८ टक्के लिंग ओळख खरी ठरली आहे. पुरुषांत हे हाड मोठे-लांब, तर महिलांमध्ये ते लहान असते.

Leave a Comment