हरिद्वार: भ्रष्टाचार प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या योगगुरू रामदेवा बाबा यांच्या ट्रस्टच्या उत्पादनांमध्ये भेसळ करण्यासाठी शासकीय गुप्तचर संस्थेतील एका अधिकार्याने ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याची तक्रार बाबांचा वाहनचालक विनय कुमार याने पोलिसांकडे दिली आहे.
रामदेव बाबांशी संबंधित पतंजली योगपीठ आणि इतर संस्थांच्या आयुर्वेदिक उत्पादनात भेसळ करण्यास केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकार्याने एका पत्रकारामार्फत आपल्याला गळ घातली. त्या मोबदल्यात ५ लाख रुपये देण्याची लालूचही त्यांनी दाखविली. ही ‘कामगिरी’ सफल झाल्यास आणखी पैसे देण्याचेही त्यांनी मान्य केले होते; असे विनय कुमार यांनी हरिद्वार येथील कनखल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.