इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडीया स्वतंत्र हवा: आयएनएस

मुंबई: इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीयावरही प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण असावे हा प्रस्ताव म्हणजे कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांचा दुराग्रह असल्याची टीका इंडियन न्यूज पेपर्स सोसायटीने केली.

मुद्रित माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रेस कौन्सिलचे इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीयावरही नियंत्रण असावे; असा प्रस्ताव कौन्सिलने केंद्र सरकारला दिला आहे. मात्र सोसायटीचा या प्रस्तावाला विरोध असून सोशल आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयावर नियंत्रण ठेवणे ही काटजू यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा आहे. त्यांनी या प्रस्तावाला सर्व कौन्सिल सदस्यांचा पाठींबा असल्याचा दावा केला असला तरीही तो पोकळ आहे; असा आरोप सोसायटीने केला आहे.

मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक, सोशल माध्यमे हे वेगवेगळे प्रकार असून त्यासाठी स्वतंत्र नियमावली असणे आवश्यक आहे; अशी सोसायटीची भूमिका आहे.भारतीय पत्रकारिता स्वत:वर नियंत्रण ठेवण्या एवढी प्रगल्भ असून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ प्रभावीपणे काम करीत आहे; असा निर्वाळाही सोसायटीने दिला.